मुंबई : शिवसेना नेतृत्व विरुद्ध बंडखोर आमदार हा संघर्ष दिवसागणिक आणखी तीव्र होत चालला आहे. आम्ही ३८ आमदार ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत, असं बंडखोर आमदारांच्या गटाने काल सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून लवकरच हे सरकार कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

‘बेळगावातील मराठी अत्याचारांवर आता यांची तोंडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

बंडखोर आमदारांना कुटुंबीयांसोबत बोलण्याची मुभा, पण…; गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधील INSIDE STORY

अमित शहांनी बंडखोरांना कोणतं आश्वासन दिलं?

शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजप नेत्यांचाच हात आहे, असा आरोप शिवसेनेकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. त्यातच शिवसेनेनं आता एका बातमीचा आधार घेत अमित शहा आणि बंडखोर आमदारांमध्ये चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ‘मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ‘श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली. गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे,’ अशी खोचक टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here