करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दादर, माहीम, धारावी येथे उपचाराधीन रुग्णसंख्येत वाढ होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे ही संख्या नियंत्रणात राहिली होती. रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असली तरीही लक्षणांची तीव्रता अधिक नसल्याने रुग्ण तीन ते चार दिवसांमध्ये बरे होतात, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. पाटील यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही ते म्हणाले.
करोना बाधितांच्या संख्येमध्ये सोमवारी मोठी वाढ झाली नसली तरीही पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. पाच मृत्यूंमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून त्यांना सहआजार होते. मुंबईत १,०६२ नव्या बाधितांची नोंद झाली असून त्यात लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांची संख्या ९४ टक्के इतकी आहे. संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात ६८ जणांना दाखल करावे लागले असून त्यापैकी ऑक्सिजन खाटांवर असलेल्या रुग्णांची संख्या सात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.