रथाचा आकार आणि लागणारी फुले
तुकाराम महाराजांचा रथ सहा बाय तेरा फूट आकाराचा आहे. रथ आणि पालखीच्या सजावटीसाठी आवश्यक असलेली फुले दररोज पुण्याहून विशेष वाहनातून येतात. रथ आणि पालखी सजावटीसाठी विविध फुलांच्या पेंढ्यांसह अन्य २०० किलो फुले लागतात. सजावट करणाऱ्या शिवतारे कुटुंबासह पाच कारागीर रोज आठ तास यासाठी काम करीत असतात. देहू ते पंढरपूर यादरम्यान अठरा दिवस रोज रथाची सजावट केली जाते, तर २३ दिवस पालखीची सजावट करण्यात येते. परतीच्या मार्गावर चार वेळा फुलांनी सजावट केली जाते.
सजावटीसाठी लागणारा वेळ
पुण्याच्या मार्केट यार्डमधून विशेष वाहनाने फुले आणली जातात. दुपारी तीन ते साडेतीन वाजल्यापासून पुढील मुक्कामाच्या ठिकाणी सजावटीची तयारी सुरू होते. फुलाची घडी करणे, ग्रील करणे, तोरण करणे, बॉल कट मारण्याची कामे करण्यात येतात. काही ठरावीक फुले पाण्यात दोन ते तीन तास ठेवावी लागतात आणि त्यानंतर रात्री दहापर्यंत साइड पट्टी तयार करून घेणे, मध्यरात्री १२.३० पासून रथ सजवण्यास सुरुवात होऊन पहाटे चार वाजेपर्यंत सजावट पूर्ण केली जाते. त्यासाठी स्पंज (वायसोस), सुतळी, जाळी, दोरा आदी साहित्याचा वापर होतो.

या फुलांचा होतो वापर
जरबेरा, लिलीयम, एंथोरियम, गुलछडी, गोंडा, मोगऱ्यासह अबोली, झेंडू, गुलाब, ट्युलिप, शेवंती, गुलछडी, ऑर्किड आदी फुलांचा पालखी आणि रथाच्या सजावटीमध्ये समावेश होतो. एकूण २० प्रकारच्या फुलांचे १२० बंडल यासाठी वापरण्यात येतात. (एका बंडलमध्ये साधारण २० फुले असतात). यासह उपलब्धतेनुसार इतर फुलांचाही वापर करण्यात येतो.
आमची दुसरी पिढी संत तुकाराम महाराजांच्या पालखी आणि रथाच्या सजावटीचे काम करीत आहे. मी मागील सात वर्षांपासून हे काम करतो. पुण्याहून फुले आणल्यानंतर आठ तास काम करून पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान रथाची व पालखीची सजावट पूर्ण होते. सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व सजावट केली जाते. तुकाराम महाराजांच्या चरणी याद्वारे सेवा करण्याची संधी मिळते.
– भागवत शिवतारे, सजावटकार
संकलन- संतराम घुमटकर, बारामती