सर्व आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई मागे घेतलेली नाही. याचा फैसला आता ११ जुलैला होणार आहे. त्यादरम्यान कोणत्याही गोष्टी करायचा प्रयत्न झाल्यास मज्जाव करण्यात येईल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. याच्या जोडीला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या नेतृत्त्वासोबत संपर्कात आहेत. त्यांचं म्हणणं ठाम आहे की, आम्ही मुंबईत किंवा विधानसभेत मतदानाला आल्यास शिवसेनेचे समर्थन करू, असे अनिल देसाई यांनी सांगितले. अनिल देसाई यांचा हा दावा खरा ठरल्यास एकनाथ शिंदे यांचे बंड पूर्णपणे फसू शकते. त्यामुळे आता हा धोका टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या ‘महाशक्ती’कडून काय पावले उचलली जातात, हे पाहावे लागेल.
अमित शहांनी ते एक आश्वासन दिलं आणि बंडखोरांमध्ये उत्साह संचारला
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ‘श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, असे ‘सामना’त म्हटले आहे.