मुंबई : सत्ताधारी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याने अखेरच्या क्षणी विविध खात्याच्या मंत्र्यांकडून निर्णयांचा धडाका सुरू असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत तक्रार केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची अखेर राज्यपालांनी दखल घेतली आहे.

‘राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने हस्तक्षेप करण्याबाबत मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांना पत्र पाठवलं आहे,’ अशी माहिती दरेकर यांनी दिली होती. त्यानंतर राजभवनातून हालचाली सुरू झाल्या असून राज्यपालांनी राज्य सरकारला याबाबत विचारणा केली आहे.

ठाकरे सरकारचं मोठं पाऊल, बंडखोर मंत्र्यांनी घेतेल्या निर्णयांच्या फाईल्स मागवल्या

मंत्र्यांकडून घाईघडबडीत निर्णय घेतले जात असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देण्यात यावं, असं राज्यपालांकडून सरकारला कळवण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी करोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र नुकतीच त्यांनी करोनावर मात केली आणि आपल्या नियमित कामांना सुरुवात केली. त्यानंतर लगेच राज्यपालांनी सरकारला मंत्र्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत स्पष्टीकरण मागितल्याने यावर राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय होता प्रवीण दरेकर यांचा आरोप?

महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांत तब्बल १०६ जीआर काढले आहेत. आमदारांना १ हजार ७७० कोटींच्या निधीपैकी ३१९ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मविआच्या या निर्णयांना प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला होता. तसंच महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणीही दरेकर यांनी राज्यपालांकडे केली होती.

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here