शिवसेनेचे जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती चुकीची आहे. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असे हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरश: खिळखिळी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी कायदेशीररित्या मान्यता मिळवून भाजपला पाठिंबा दिल्यास किंवा बहुमत चाचणीवेळी सभागृहात हे आमदार गैरहजर राहिल्यास भाजपचा सत्तेवर येण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडून सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु असून त्यांच्याकडून शक्य त्या प्रत्येक पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
राज्यात ५ जुलैपर्यंत भाजपचं सरकार?
महाराष्ट्रात ५ जुलैपूर्वी भाजप सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. २९ जूनपर्यंत भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. यासोबतच शिंदे गटात सरकार स्थापनेबाबत मंथन सुरु असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ६ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री पदं मिळू शकतात. शिंदे आणि भाजप यांच्यात सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.