भाजपनं राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं समजतं. भाजप आणि शिंदे गटात सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. शिंदे गटाला १३ मंत्रिपदं मिळू शकतात. पैकी ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदं असण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून २९ जणांना मंत्रिपदं मिळू शकतात.
शिंदे यांच्यासोबत किती मंत्री?
गुवाहाटीतील हॉटेलमध्ये सध्या ९ माजी मंत्री आहेत. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर गुवाहाटीत वास्तव्याला आहेत. पैकी कडू, यड्रावकर हे शिवसेनेते आमदार नाहीत. पण त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र बंडखोरी केल्यानं सगळ्यांचीच मंत्रिपदं काढून घेण्यात आली. सध्या शिवसेनेचे ४ जणच मंत्रिपदी आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरेंचा समावेश आहे. पैकी आदित्य ठाकरे विधानसभेचे सदस्य असून बाकीचे तिघे परिषदेचे सदस्य आहेत.
राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्री ठाकरेंशी संवाद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी १६ जणांना अपात्रेसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात पहिलाच संवाद साधला. राज्य सरकारविरोधात लवकरच अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो.