कलाकृतीचा टीझर मग प्रोमो, रिअॅलिटी शोमध्ये कलाकारांची हजेरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद हे सगळे फंडे कलाकृतींच्या प्रमोशनसाठी वापरले जातात. या पलीकडे जात चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता कलाकार मंडळी करीत आहेत. त्यातूनच प्रमोशनचे वेगवेगळे फंडे निर्माते आणि चित्रपटांच्या टीमकडून आजमावले जात आहेत. सोशल मीडियावर गाजत असलेल्या सीरीजमध्ये एखाद्या भागात काम करणं, विविध शहरांमध्ये सायकल राइड, चाहत्यांच्या ग्रुपशी गप्पा मारणं, कलाकृतीच्या नावचे टीशर्ट चाहत्यांना भेट म्हणून पाठविणं, त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं इथपासून विमान, लोकल, रिक्षा, बस अशा सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचा वापर करून कलाकृतींची जाहिरात केली जात आहे. प्रमोशनची ही धाव अधिकाधिक चाहत्यांपर्यंत कशी जाईल यासाठी कलाकारही जीव तोडून प्रमोशनमध्ये सहभागी होताना दिसतात.

प्रमोशनच्या फंड्यामध्ये वयोगटांनुसार चाहत्यांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न चित्रपटांच्या टीमकडून होतात. त्यासाठी शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या प्रेक्षकापर्यंत कसं पोहोचता येईल याचं नियोजन केलं जातं आणि त्यानुसार माध्यमं निवडली जातात. करोनाकाळानंतर प्रमोशनच्या फंड्यात झालेले बदल दिसू लागले. हिंदीसह मराठी कलाकारांनीही मोठ्या प्रमाणावर रिअॅलिटी शो आणि तरुणाईच्या आवडत्या माध्यमांकडे मोर्चा वळविला. आलिया भटनं तिच्या चित्रपटासाठी ओपन बसमध्ये प्रवास करण्याला पसंती दिली, तर वरुण धवन आणि कियारा अडवाणी सध्या विविध शहरांमधले मॉल, मल्टिप्लेक्सेस यासह बाइक आणि सायकल राइड अशा गोष्टींचा वापर करत चाहत्यांशी संवाद साधत आहेत. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्येही ही मंडळी सहभागी होत कलाकृतींचं प्रमोशन करत आहेत.

विशेष म्हणजे मराठी चित्रपटांनीही अशा प्रमोशनमध्ये आघाडी घेतली आहे. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे ही जोडी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी यू-ट्यूबवर प्रसारित होणाऱ्या मराठी सीरीजमध्ये चमकली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांनी रेस्तराँसह विविध ठिकाणांना भेट देत प्रमोशन केलं. प्राजक्ता माळी आणि मुक्ता बर्वे यांनीही आगामी चित्रपटासाठी चाहत्यांशी संवाद साधण्याला पसंती दिली. नुसरत भरुचानं तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. वाढलेली स्पर्धा, सोशल मीडियाचा भडिमार, चित्रपट आणि ओटीटी यावर काही प्रमाणात विभागला गेलेला प्रेक्षक, जागतिक सिनेमामुळे कलाकृतींच्या दर्जाबाबत चोखंदळ झालेला प्रेक्षक या सगळ्याचा परिणाम पाहून आता प्रमोशनची गणितं बदलत आहेत. दाक्षिणात्य सिनेमांच्या यशानं आता या स्पर्धेत हिंदीसह मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच धडपड करावी लागणार, असल्याचं मत सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

प्रमोशनच्या शर्यतीत मराठी कलाकृतीही मागं नाहीत, हे प्रसिद्धीच्या विविध क्लृप्त्या वापरण्यानं सिद्ध झालं आहे. मराठी चित्रपटासमोरही आता हॉलिवूड, दाक्षिणात्य व इतर प्रादेशिक कलाकृतींची स्पर्धा आहे. जागतिक सिनेमाच्या स्पर्धेत उतरायचं असेल, तर आता मराठी सिनेमानंही या चौकटीबाहेर पडलंच पाहिजे आणि त्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

– अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here