गुवाहाटी: शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. आज पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आलेले फडणवीस आता ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत. फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि आशिष शेलार राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला गेले. अर्धा तास बैठक चालली. या बैठकीत भाजपनं बहुमत चाचणीची मागणी केली. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यानं सरकार अल्पमतात आलेलं आहे. शिंदेंसोबत सेनेच्या ३९ आमदारांसह १० अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपनं सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
आताची मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला
शिंदे गटाची बैठक सुरू
गेल्या आठवड्याभरापासून गुवाहाटीत मुक्कामी असलेल्या शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मुंबईला परतण्याची तारीख आणि वेळ निश्चित होऊ शकते. फडणवीस आणि कोश्यारी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली शिंदे गटाची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिंदे गटाचं संख्याबळ पाहता विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानात त्यांची भूमिका कळीची असेल.
ठाकरे सरकार संकटात! बंडखोर आऊट, अपक्ष इन; विश्वासदर्शक ठरावासाठी शिंदेंचा मेगाप्लान?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि १० अपक्ष आमदार आहेत. शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार राज्यात आल्यास आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान केल्यास सरकार सहज कोसळेल. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडे बहुमत सिद्ध करण्याइतकं संख्याबळ नाही. अशा परिस्थितीत भाजप शिंदे गटाच्या मदतीनं सरकार स्थापन करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here