टाइम्स वृत्त, कोल्हापूर: गाव सोडून रोजीरोटीसाठी शहराकडे निघालेल्या वडिलांचे बोट पकडून शालेय जीवनातच ठाण्यात राहावयास आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रभर नाव कमावलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पुढील प्रत्येक पावलाकडे साताऱ्यापासून ८५ किमीवर असलेल्या सह्याद्री डोंगररांगांतील दरे या गावचे लक्ष लागून राहिले आहे. गावच्या काही समस्यांवर मार्ग काढलेल्या शिंदे यांनी आता मुख्यमंत्री होऊन गावात यावे, अशी भावना काही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

सह्याद्री डोंगरातील जंगल आणि कोयना नदीच्या कुशीत वसले आहे दरे हे गाव. ३० उंबऱ्यांच्या या गावात २७ कुटुंबे शिंदे आडनावाची आहेत. एकनाथ शिंदे यांचेही घर यापैकीच एक; पण संभाजी शिंदे हे रोजीरोटीसाठी ठाण्यात पोहोचले. त्यांचा मुलगा एकनाथ शिंदे त्या वेळी शाळेत होते. मात्र, शिंदे कुटुंबाने दरे गावाची नाळ तोडली नाही. ‘गणेशोत्सव व इतर सणांच्या काळात एकनाथ शिंदे गावात येतात. शिंदे यांना करोना झाला होता, त्यावेळीही त्यांनी १० दिवस गावातच मुक्काम ठोकला होता. जानेवारीत गावची जत्रा असते. त्यावेळी शिंदे कुटुंब नेहमी त्यासाठी उपस्थित राहतात,’ अशी माहिती ग्रामस्थ रूपेश शिंदे यांनी दिली. ‘आम्ही शिंदे कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. ते मुख्यमंत्री बनून गावात यावेत, हीच इच्छा आहे,’ असेही ते म्हणाले.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यास गावच्या काही समस्याही दूर होतील, अशी त्यांना आशा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना ४० किलोमीटर अंतरावरील तापोळा येथे जावे लागते. पावसाळ्याचे तीन महिने गावाचा इतर मोठ्या गावांशी संपर्क तुटत असल्याने नदीवर पूल उभारला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सर्व समस्यांवर उतारा मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.

दोन हेलिपॅड, फार्म हाऊस
शिंदे यांनी दरे गावापर्यंत रस्ता आणला. गावातील रस्ते काँक्रिटचे केले. गावाला तीन विहिरी आणि एक बोअरवेल मिळाली. शिवाय गावात विजेचाही त्रास नाही. गावातील क्रिकेट मैदानावर दोन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. शिंदे यांनी डिसेंबर २०१८मध्ये गावात १२ एकर शेतजमीन खरेदी केली आहे, तर त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनी नोव्हेंबर २०१७मध्ये २३ एकर जमीन खरेदी केली. शिंदे कुटुंब सध्या परिसरात फार्म हाउस उभारत असून, त्यावर त्यांचा चुलत भाऊ अशोक शिंदे देखरेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here