मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं स्पष्ट केल्यानंतर सरकार अस्थिर झालं आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी राज्य सरकार अल्पमतात असल्याचा दावा करत त्यांना बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. आतापर्यंत ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत असणारा भाजप मैदानात उतरल्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला असून फडणवीसांना धोक्याचा इशारा दिला आहे.

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाची आस धरून बसले असतील तर त्यांना आधी महाराष्ट्रात धुमसणाऱ्या आगीशी सामना करावा लागेल. भाजप हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे,’ अशी भूमिका शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मांडली आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप, कोर्टात याचिका दाखल

‘…पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत’

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत पुरेशी हक्काची मते नसतानाही भाजपला एक अतिरिक्त जागा मिळवण्यात यश आलं होतं. या निवडणुकीचाही उल्लेख करत शिवसेनेनं बंडखोरांवर निशाणा साधला आहे. ‘राज्यसभा, विधान परिषदा गद्दारांच्या मदतीने जिंकल्या, पण शेवटी लोकभावना तीव्र आहेत. शिवसेनेतून जे फुटले ते टिकले नाहीत. भुजबळांना शरद पवारांनी व राणेंना भाजपने आधार दिला नसता तर त्यांचे काय उरले असते? स्वतःचे सत्त्व आणि अस्तित्वच हे लोक गमावून बसले. हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱया झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद ‘मऱ्हाटी’ मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते,’ अशा शब्दांत शिवसेनेनं बंडखोरांसह भाजपला आव्हान दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here