एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
शिवसेनेसोबत चर्चेचे दरवाजे आता बंद झालेत: केसरकर
गुवाहाटीतील शिवसेनेचे काही आमदार परत येतील, असे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटते. मात्र, त्यांना फक्त वेडी आशा आहे हो, प्रत्यक्षात असे काहीही घडणार नाही, असे वक्तव्य बंडखोर शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं तरी हे सरकार पडेल, ३९ लोकं तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसं बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना असलेली वेडी आशा आहे. शिवसेनेतील मोठ्या नेत्यांना हीच आशा आहे, आता यावर मी काय बोलणार? लहान मुलं अशी विधानं करू शकतात. पण मोठी लोकंच अशी बोलायला लागली तर बघायलाच नको. गुवाहाटीत शिवसेनेचे सर्व आमदार आनंदात आहेत. वाटल्यास आम्ही त्यांचे व्हिडिओ शेअर करायला तयार आहोत. त्यामुळे ३९ बंडखोर आमदारांपैकी कुणीही शिवसेनेकडे परत जाण्याची शक्यता नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.