कोल्हापूर : राज्यातील सत्तानाट्य आता निर्णायक वळणावर पोहोचलं असून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाने पक्षासोबत येण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाविकास आघाडी अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यामुळे बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे हे आजच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने बहुमत चाचणीच्या आदेशाला विरोध करत याचिका दाखल केली असून या याचिकेवरील निकालानंतर तातडीने राजीनाम्याचा निर्णय होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. शिंदे परत यावेत यासाठी गेले दोन-तीन दिवस विविध मार्गाने प्रयत्न झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही शिंदे यांना परतीचे आवाहन केले, मात्र शिंदे यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे आता महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करणे आव्हानात्मक झाले आहे.

‘ठीक आहे, आजपासून मी बोलायचं थांबतो…’; बंडखोरांच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा देण्याची शक्यता आहे. बहुमतच आघाडीच्या बाजूला नसल्यामुळे सभागृहात नाचक्की होण्यापेक्षा अगोदरच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सायंकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आता गुवाहाटी येथून गोव्याला जाण्यासाठी निघाले आहेत. बहुमत चाचणीची वेळ आलीच तर मुंबईपासून आमदार जवळ असावेत म्हणून त्यांना गोव्यात आणण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते सक्रिय आले असून आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here