मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेची दोन शकलं होऊन महाविकास आघाडी सरकार आता कोसळण्याच्या स्थितीत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या २४ तासांत महाविकास आघाडी सरकार पायउतार होईल, अशी चिन्हे दिसत आहे. या बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेले एकनाथ शिंदे गटाचे आमदारही मुंबईत दाखल होणार आहेत. त्यापूर्वी हे सर्वजण प्रथम गोव्यातील एका हॉटेमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर या सगळ्यांना कडेकोट सुरक्षाव्यस्थेत मुंबईत आणले जाईल.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार आज दुपारी गोव्याच्या दिशेने रवाना होतील. गुवाहाटीहून निघण्यापूर्वी शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे हे सर्व आमदार कामाख्या देवीच्या मंदिरात दाखल झाले होते. आता देवीचा आशीर्वाद घेऊन हे सर्व बंडखोर पुढच्या मोहीमेसाठी रवाना होतील. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्राध्यापक हरी नरके यांची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये हरी नरके यांचे विश्लेषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, आमदारांनाही सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत’
कामाख्या देवी पावते का? इतिहास काय सांगतो?: प्रा. हरी नरके

घटना सभेत १७/१०/१९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रास्ताविका /सरनामा मंजुरीसाठी सादर केला. ” आम्ही भारताचे लोक ” ही बाबासाहेबांनी केलेली सुरुवात काही सनातनी सदस्यांना आवडली नाही. त्यांनी “देवाच्या नावाने ” अशी दुरुस्ती सुचवली. त्यावर आसामचे सदस्य रोहिणीकुमार चौधरी यांनी आपण कामाख्या देवीचे भक्त असून सरनाम्याची सुरुवात ” देवीच्या नावाने ” करावी अशी दुरुस्ती मांडली.

त्यावर भरपूर चर्चा झाली. शेवटी विषय मतदानाला टाकण्यात आला. लोकशाहीमध्ये लोक हेच सर्वोच्च आणि सार्वभौम असतात यावर डॉ. आंबेडकर ठाम राहिले. सभागृहात २९२ सदस्य हजर असूनही त्यातल्या ६३ टक्के सदस्यांनी देव, देवी की लोक या वादात न पडता तटस्थ भूमिका घेतली. ३७ टक्के सदस्यांनी मतदान केले. झालेल्या मतदानातील ३८ टक्के मते देव, देवीला तर ६२ टक्के मते लोकांना पडली.इतिहास सांगतो, कामाख्या देवी काही पावली नाही.

पण तेव्हा ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग, राज्यपाल, तसेच इतर सगळ्या केंद्रीय यंत्रणा नाना पेशव्यांच्या कबज्यात नव्हत्या. देशाचे नेतृत्व नेहरू करीत होते. आज आसाम बापूंच्यामागे दिलासालय ते केंद्र सरकार सारे काही आहे. लढाई फक्त सत्य आणि न्यायाची नसून अतिशय विषम आहे. बघू यावेळी कोणाची सरशी होते ते. नाना पेशवे तथा कामाख्यादेवी की संविधान? कोण जिंकते ते दिसेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here