लंडन हायकोर्टाच्या चॅन्सरी खंडपीठापुढे मल्ल्या यांनी केलेल्या अपीलावर सोमवारी सुनावणी झाली. ज्यात खंडपीठाचे न्यायाधीश टॉम लेच यांनी मल्ल्या यांच्याशी संबधित सर्वच खटले एकमेकांशी संबधित असल्याने एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
मल्ल्या यांच्याविरोधात एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाने मल्ल्यांकडून कर्ज वसुलीसाठी याचिका दाखल केली आहे. मल्ल्यांवर मनी लॉंडरिंगचा आरोप असून सध्या जामिनावर आहेत. त्याशिवाय मल्ल्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे. मल्ल्या यांनी ब्रिटीश सरकारकडे आश्रय मिळावा, अशी मागणी केली आहे.
मागील पाच वर्षांपासून विजय मल्ल्या लंडनमध्ये आहेत. मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी जवळपास ९००० कोटींचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने अनेक सरकारी बँकांना तोटा झाला होता. मल्ल्या यांनी बँकांची कर्जे बुडवून लंडनला पलायन केले होते. भारतातील न्यायालयांनी मल्ल्या यांना फरार घोषीत केले. तसेच विविध तपास यंत्रणांची मल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त केली. काही मालमत्तांचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्यात आली.
दरम्यान, लंडनमध्ये देखील मल्ल्या यांच्या विरोधात न्यायालयीन खटला चालवण्यात आला. ज्यात मे २०२० मध्ये लंडन हायकोर्टाने मल्ल्या यांना दिवाळखोर घोषीत केले होते. मात्र या आदेशाने मल्ल्या यांची समाजातीत पत कमी झाली असून प्रतिमा मलीन होत असल्याचे मल्ल्या यांनी न्यायालयात सादर केलेल्या अपीलात म्हटलं आहे. दिवाळखोर घोषीत करण्याचा आदेश मागे घ्यावा अशी विनवणी मल्ल्या यांच्या वतीने करण्यात आली आहे. या अपिलावर आता पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाणार आहे.