देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन तसेच भाजप आमदारही उपस्थित आहे. या बैठकीत उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीविषयी आणि भाजपच्या रणनितीविषयी चर्चा होत आहे. जवळपास ४० मिनिटांपासून भाजप नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. संध्याकाळी ५ वाजता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडेही भाजप नेत्यांचं लक्ष आहे.
तिकडे बंडखोर आमदार कामाख्या देवीचरणी लान
उद्या ठाकरे सरकारच्या ‘बहुमताची परीक्षा’ होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यानंतर गुवाहाटीमध्ये असलेल्या शिंदे गटामध्ये उत्साहाचं वातावरण संचारलं आहे. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्याअगोदर एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. हॉटेलपासून मंदिरापर्यंत जात असताना आमदारांना सुरक्षा व्यवस्थांच्या जवानांनी गराडा घातला होता. यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होणार आहे. उद्या बहुमत चाचणीसाठी आम्ही मुंबईत जातोय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.