मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाननं हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशकं पूर्ण केली. यानिमित्तानं त्याच्या आगामी ‘पठान’ या चित्रपटातील त्याचा दमदार लूक प्रेक्षकांसमोर आला. त्यानं नुकतंच सोशल मीडियावर एक लाइव्ह सेशनही घेतलं होतं. त्यात त्यानं चाहत्यांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.
त्याच्या ३० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीबद्दल तो म्हणाला, ‘मी माझ्या ३० वर्षांच्या या कारकिर्दीत सिनेमांच्या सेटवर दिवसातले १५ तास काम करताना फार मजा केलीय. मी इतकी वर्षं इथे काम करू शकेन, असा विचार मी कधी केला नव्हता. मी हा विचार करून मुंबईला आलो होतो की, २-४ वर्षांत ५-६ सिनेमे करून पुन्हा दिल्लीला जाईन. मात्र आज मी जे यश मिळवलंय आहे, ते केवळ माझ्या चाहत्यांमुळे शक्य झालंय.’
तसंच तो पुढे म्हणाला, ‘आता ३० वर्षं उलटल्यावर मी काहीतरी वेगळं करू इच्छितो. माझ्या वयाच्या ५६व्या वर्षी अॅक्शन चित्रपट करण्यासाठी उशीर झाला असला तरीही मी तो करतोय.’ यादरम्यान त्याच्या एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला, ‘त्याचं सर्वात रोमँटिक पात्र राहुलला तो मिस करतो का?’ यावर किंग खान म्हणाला, ‘मला आठवतही नाही की मी राहुल हे पात्र शेवटचं कधी साकारलं होतं आणि मला त्याची फारशी आठवणही येत नाही.
शारोमँटिक पात्र साकारण्यासाठी मी बऱ्यापैकी ज्येष्ठ झालोय. मी एक चित्रपट अत्यंत कमी वयाच्या अभिनेत्रीसह केला होता. ते थोडं विचित्र वाटतं. मला राज आणि राहुल ही पात्रं साकारायला नेहमीच मजा आली. याच पात्रांमुळे मला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं. ते कायम माझ्या आयुष्याचा भाग राहतील. पण, आता रोमँटिक सिनेमे करण्याचं वय नाही.’