पुणे/ पिंपरी चिंचवड : राज्यपालांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्या (गुरुवारी) महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाणार आहे. या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी भाजपचे पुण्यातील दोन आजारी आमदार जाणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र, या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक या आज दुपारीच पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तर दुसरीकडे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे या मतदानासाठी जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र वरिष्ठांचा आदेश आला तर त्वरित निर्णय घेऊ अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली.

आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे ते उद्या मतदानासाठी जाणार की नाही हा निर्णय त्यांचे कुटुंबिय घेणार आहेत. मात्र त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या मतदानाला जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्या राज्य सरकारची बहुमत चाचणी पार पडणार आहे. यासाठी दोन्ही बाजुंनी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्या आमदाराला हजर राहण्याबाबत सूचना दिल्याचे समजते आहे. मात्र लक्ष्मण जगताप यांना अद्याप कोणताही निरोप आला नसल्याचे शंकर जगताप यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Vidhan Parishad Election 2022: कॅन्सरशी झुंज, बोलता बोलता धाप लागली, पण मुक्ता टिळकांनी ‘पक्षाचा आदेश’ सांगितला!
बहुमत चाचणीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष अधिवेशन होणार आहे. मात्र जगतापांची तब्येत पाहता ते दिवसभर उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे जगताप उद्याच्या बहुमत चाचणीला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा : भाजपनं लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना सहानुभूती दाखवायला हवी होती | सतेज पाटील
दरम्यान, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजपच्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी दुपारच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

राज्यसभेची तिसरी जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता. अवघ्या दहा दिवसातच असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठीही हे दोन्ही आमदार मतदानासाठी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here