मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. १० मे रोजी राज यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत होता. राज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलनं करणाऱ्या, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून राज यांनी एका पत्राच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. तब्बल २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. ध्वनीप्रदूषण करणारे, लोतांना त्रास देणारे मशिदींवरचे भोंगे उतरवले जाऊ नयेत त्यासाठी हे सगळं सुरू आहे, असं राज यांनी उद्धव यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं.
या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदाची चर्चा उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सुरू आहे. ‘राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!’, असं राज यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं होतं. राज यांनी हे पत्र ट्विट केलं होतं. राज यांनी दीड महिन्यांपूर्वी केलेल्या या ट्विटची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.