मुंबई : बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं सरकार शिवसेनेतील बंडखोरीमुळे अडीच वर्षांत सत्तेपासून दूर झालं आहे. सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात हालचालींना वेग आला असून आता नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये आपला वाटा कसा असावा, याबाबत खलबतं केली जाणार आहे. याबाबत शिंदे गटाची १० वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

अपक्ष आमदार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकार अल्पमतात असल्याचा दावा करण्यात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. या चाचणीला आम्ही उपस्थित राहणार असल्याचं शिवसेना नेतृत्वाला आव्हान देऊन गुवाहाटी येथे गेलेले एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आणि मुंबईत येण्याआधी ते गोव्यात दाखल झाले. एकनाथ शिंदे हे गोव्यातील हॉटेलमध्ये आज आपल्यासोबत असणाऱ्या आमदारांसोबत चर्चा करतील आणि नंतर मुंबईला रवाना होतील, अशी माहिती आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजप आमदारांचे मंत्रीपदासाठी लॉबिंग; ‘ही’ नावे आघाडीवर

उपमुख्यमंत्रिपदासह आणखी काय मिळणार?

एकनाथ शिंदे यांचा गट सत्तास्थापना करण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार, हे स्पष्ट आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत इतरही अनेक महत्त्वाची खाती शिंदे यांच्या गटातील आमदारांना मिळतील, अशी माहिती आहे. शिवसेना नेतृत्वाचा विरोध असतानाही पक्षाच्या ४० आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याने या आमदारांना योग्य तो न्याय भाजपकडून दिला जाईल, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या सर्व बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here