मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला होता. उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशी चर्चा असली तरी ते शेवटपर्यंत लढून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाईल, अशी आशाही अनेकांना होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अचानक एक्झिट घेतली. उद्धव ठाकरे हे लगेचच राजीनामा देतील याची कल्पना महाविकास आघाडीतील मित्रपक्षच काय पण शरद पवार यांनाही नव्हती, असे आता दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray Resigns)
मोहीम फत्ते! शिंदे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक; मंत्रिपदांबाबत होणार चर्चा
यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या उद्धव ठाकरे राजीनामा देतील, याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. मी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्रच टीव्ही पाहत होतो. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार साहेबांनी काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. पण उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा सूर पाहूनच शरद पवार यांनी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, हे ओळखले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

यावेळी जयंत पाटील यांनी आगामी काळातही महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रच राहतील, असे संकेत दिले. सरकारचं पडणं आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही.शिवसेना पक्ष असूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. पक्ष सोडून गेलेले किंवा जाणारे यांच्या अपात्रतेसंदर्भात पुढे काय होतं हे माहिती नाही. पण कायदेशीररित्या पाहिलं तर संख्याबळ दोन तृतीयांश झाल्यानंतरही तुम्ही पक्ष सोडू शकत नाही. सगळे सोडून गेले आणि फक्त एक आमदार शिवसेनेसोबत असला तरी ते पक्ष सोडू शकत नाहीत. आमदार राहायचं असेल तर त्यांनाही शिवसेनेत थांबावं लागेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ स्मरणात राहतील’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिलेले जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांचा गौरव केला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने जनतेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेच्या मनात दीर्घकाळ राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आमचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अद्भुत प्रयोग कला. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला एकत्र आणले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. या बरोबरच अनेक चांगल्या योजना या सरकारने आणल्या. राज्यातील जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here