यावेळी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.त्यावर एकनाथ शिंदे यांनी, उद्धव ठाकरे यांच्याविषयी आम्च्या मनात कालही आदर होता, आजही आदर आहे. उद्धव ठाकरे यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. हे सर्व सुरु असताना आम्हालाही आनंद वाटत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
तसेच सर्व आमदारांनी गटनेता म्हणून मला सर्व अधिकार दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मी मुंबईत गेल्यानंतर राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन. त्यानंतर आम्ही पुढची रणनीती निश्चित करु, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘भाजपकडून कोणती आणि किती मंत्रिपदं मिळणार?’
एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरुवारी सकाळी ट्विट करुन आगामी वाटचालीसंदर्भात भाष्य करण्यात आले . यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.