‘आमचा उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणताही आक्षेप नव्हता. आमचं जे काही म्हणणं होतं ते महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांबाबत होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढत असताना आम्हाला अप्रत्यक्षपणे आमच्या नेत्यासोबतही लढावं लागलं, याचं दु:ख आहे. आपला जो नैसर्गिक मित्रपक्ष आहे त्याच्यासोबत युती करा, असं आम्ही मागील दीड वर्षांपासून सांगत होतो. मात्र त्याबाबत शेवटपर्यंत निर्णय घेतला न गेल्याने ही वेळ आली आहे,’ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपदांची संख्या ठरली?
उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊन बंडखोरी केलेला गट सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणार, हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिंदे गटाला नव्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपदे मिळणार, याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चेवर बोलताना केसरकर म्हणाले की, नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत अजून कोणतीच चर्चा झालेली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे हे आताच काही वेळापूर्वी मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत. मात्र आधीच मंत्रिपदाच्या चर्चा निर्माण करून येथे असलेल्या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करावी लागेल. प्रत्येक आमदाराला एकनाथ शिंदे यांचा अॅक्सेस आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो आमदारांशी चर्चा करूनच ते घेतील,’ अशी माहिती दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.