मिशन १४४ ची जबाबदारी कोणावर?
देशाच्या विविध राज्यांमध्ये असलेल्या १४४ जागा जिंकण्यासाठी भाजपनं चार नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीत राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशातील बस्ती मतदारसंघाचे खासदार हरिश द्विवेदी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि राज्यसभेचे खासदार नरेश बन्सल यांचा समावेश आहे.
तावडेंकडे दक्षिण भारतातील राज्यांची जबाबदारी
भाजपनं नव्या मिशनला लोकसभा प्रवास योजना असं नाव दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडेंकडे दक्षिण भारतातील राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा फारसा प्रभाव नाही. इतर कोणत्याही राज्यांमध्ये भाजपचं अस्तित्त्व केवळ नाममात्र आहे. त्यामुळे तावडेंसमोर मोठं आव्हान आहे.
हरिश द्विवेदी यांच्याकडे महाराष्ट्र, ओदिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संबित पात्रा बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये लक्ष घालतील. नरेश बन्सल यांच्याकडे उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष्य आहे. या जागांवर मेहनत घेतल्यास पक्षाचा जनाधार वाढेल आणि लोकसभेत पक्ष आणखी मजबूत होईल, असं नेतृत्त्वाला वाटतं. नेतृत्त्वानं जबाबदारी दिलेले ४ नेते त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेल्या राज्यांचा वारंवार दौरा करतील. तिथल्या प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री आणि राज्यातील अन्य नेत्यांच्या सातत्यानं बैठका घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतील.