एक चिमुकला आपल्या वडिलांसोबत उद्धव ठाकरेंचं सरकार कसं कोसळलं, आता पुढे काय होणार, कुणाचं सरकार येणार, यावर चर्चा करतो आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन जाण्याची वेदना चिमुकल्याच्या आवाजात स्पष्ट दिसत आहे. त्यावर त्याचे वडिलही हे राजकारण आहे रे बेटा, इथे असंच होतं, असं समजावत आहेत. दरम्यान, आपण उद्धव ठाकरेंना भेटायला जायचं का? असा प्रश्न चिमुकला आपल्या वडिलांना विचारत आहे. त्यावर लवकरच आपण मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊ, असं चिमुकल्याचे वडील त्याला म्हणतात
हृदयाचा ठाव घेणारा Audio Call
चिमुकला : हॅलो अब्बा, उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला
वडील : हो बेटा, उद्धव साहेबांनी राजीनामा दिला
चिमुकला : अब्बा, आता कसं होणार?
वडील : उद्धवसाहेब नाहीत तर आता अवघड आहे
चिमुकला : आता आपण काय करायचं
वडील : आपण काय करायचं तेव्हा, उद्धवसाहेबांसोबत राहायचं
चिमुकला : जे काय घडलं ते खूप चुकीचं घडलं, अब्बा
वडील : हो ना बेटा… गद्दार लोकांमुळे झालं सगळं
चिमुकला : काल मम्मी रडत होती
वडील : मम्मी रडत होती होय…? सगळ्यांनाच वाईट वाटलंय, पण काय करणार, राजकारण आहे हे
चिमुकला : उद्धवसाहेबांना भेटायला जायचं का?
वडील : हो जाऊ ना, मुंबईला भेटायला जाऊयात त्यांना
चिमुकला : वाईट झालं अब्बा
वडील : हो बेटा खूप वाईट झालं
चिमुकला : मी त्यांचं स्टेटस ठेवलं होतं
वडील : हो बेटा, मी पण ठेवलं होतं… बेटा आपण उद्धवसाहेबांना सोडून नाही जायचं
चिमुकला : अब्बा, ते पुन्हा येतील काय
वडील : हो बेटा येतील ना
चिमुकला : अब्बा, आता कुणाचं सरकार येईल
वडील : देवेंद्र फडणवीस, दुसरं कोण तेव्हा
चिमुकला : मग तर भाजपचं सरकार येईल
वडील : हो ना, भारतीय जनता पार्टी…जाऊ दे उद्धवसाहेब येतील पुन्हा…
चिमुकला : बरं अब्बा, करतो बंद फोन..
वडील : बरं बरं… ठेव..
उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची प्रचंड लाट
उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये म्हणजे फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्री म्हणून जनतेशी अखेरचा संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोडीफार खोचक टीकाटिप्पणी वगळता अत्यंत संयतपणे आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक आहे. पक्षात बंडाळी माजली असताना आणि मुख्यमंत्रीपद सोडतानाही उद्धव ठाकरे यांनी आपला तोल जराही ढळून दिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले असले तरी त्यांच्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.