भाजपने का केला धक्कातंत्राचा वापर? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यामागील चार कारणे…
१. उद्धव ठाकरे यांना शह, २०१९ चा हिशोब चुकता केला
खरं तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. मात्र शिवसेनेनं वेगळा मार्ग निवडला. शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडीची स्थापना करत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असतानाच २० जून ते ३० जून या अवघ्या १० दिवसांमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्याचं राजकारण बदलून टाकलं. शिवसेनेचे ५५ पैकी तब्बल ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले. यातून उद्धव ठाकरे यांची पक्षसंघटनेवर पकड नसल्याचं चित्र समोर आलं. मुंबई, ठाण्यासह राज्यातील ग्रामीण भागातील अनेक आमदारांनी बंडखोर गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव यांच्या शिवसेनेचं संघटनही खिळखिळं होण्याची शक्यता निर्माण झाली. ज्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना २०१९ ला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं होतं त्याच उद्धव यांना स्वत:चाच पक्ष विरोधात उभा करून मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याची किमया भाजपने करून दाखवली आहे.
२. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्थापनेपासून अनेक वर्ष सत्तेत राहिलेले पक्ष आहेत. २०१४ ला राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या दोन्ही पक्षांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाणं अवघड गेलं होतं. त्यातच २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येईपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सत्तेत येणं शक्य होणार नसल्याचं २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झालं होतं. मात्र निकालानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याची ऐतिहासिक घटना घडली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा सत्तेचा ऑक्सिजन मिळाला आणि कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळालं. आता सरकार कोसळल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागणार आहे.
३. मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज
शिवसेनेतीलच आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्रिपद गमवावं लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी राज्यात सहानुभूती निर्माण होत होती. तर दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी ही खेळी खेळल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आम्हाला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
४. मुख्यमंत्रिपद नसलं तरी सत्तेची ताकद मिळणारच!
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असले तरी विधानसभेत १०६ जागा असणाऱ्या भाजपला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार, हे स्पष्टच आहे. अर्थमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी इतर महत्त्वाची खाती असल्याने राज्याच्या सत्तेची चांगलीच ताकद भाजपला मिळणार आहे. एकीकडे केंद्राची पूर्ण बहुमताची सत्ता पक्षाकडे असताना त्याला आता राज्यातील सत्तेचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे पक्षसंघटन आणखी बळकट करण्यास आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यास भाजपला आणखीनच सोपं होणार आहे.