मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांनाही राजभवनात शपथ दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देशभरातले विविध मुख्यमंत्री यांनी शिंदे-फडणवीसांचं अभिनंदन केलं. पण उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनपर ट्विटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शपथविधीनंतर अखेर पावणे दोन तासानंतर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे.

जवळपास दहा दिवसांच्या सत्तासंघर्षाची अखेर अवघ्या चार तासांतील नाट्यमय घडामोडींनी झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा असताना फडणवीसांनी धक्कातंत्र वापरत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दोन तासांआधी सरकारमध्ये सामिल होणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या आणि हायकमांडचा आदेश आल्यानंतर शपथ घ्यायला तयार झालेल्या फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

RSS च्या संस्कारामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं, आनंदाने नाही : शरद पवार
आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, अशा सदिच्छा उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्या

पंतप्रधान मोदींकडून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदेजी यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेंकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळविषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो.

पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here