Sanjay Raut enforcement directorate ED | संजय राऊत हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. संजय राऊत यांनी सकाळीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि केंद्रीय तपासयंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी चौकशीला गेल्यानंतर शिवसैनिकांनी ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करु नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी ट्विटमधून केले आहे.

हायलाइट्स:
- शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे
- संजय राऊत हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार
- संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. शरद पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. मला आयकर खात्याने प्रेमपत्र पाठवले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये मी निवडणुकांना उभे राहताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या अनुषंगाने मला ईडीने सगळ्या वर्षांसाठीच्या नोटीस आता एकत्र पाठवल्या आहेत. सुदैवाने या सगळ्याची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र, आता आयकर खात्याची ही चौकशी कुठपर्यंत लांबणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
‘ईडीने संजय राऊतांना चौकशीला का बोलावले?’
ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network