जिल्ह्यात आजवर ४९२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले असून त्यापैकी ४१० व्यक्तींना घरीच अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे तर ८२ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकूण २ हजार ६९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बेघर आणि कामगारांसाठी एकूण ११ कॅम्प असून तेथे २२२ जण वास्तव्यासाठी आहेत. त्यांची देखभाल प्रशासन करीत आहे.
संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती कामे अटींवर सुरू करण्यात येत आहेत. पूल, रस्ते, महामार्ग यांची अर्धवट राहिलेली कामे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि वरिष्ठ अधिकारी, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवले आहे. शेजारील गोवा राज्यही आता करोनामुक्त झाले आहे.आता सिंधुदुर्ग जिल्हाही त्याच दिशेने वाटचाल करीत आहे.
राजकीय पक्षांचाही हातभार
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करोनाला हद्दपार करण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत विविध राजकीय पक्षांनीही मोठा हातभार लावला आहे. सिंधुदुर्गचे शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते अतुल रावराणे यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी पीपीई किटचे वितरण केले. भैरी भवानी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या किटमुळे डॉक्टरना रुग्णसेवा करणे सोपे जाणार आहे. डॉक्टरना रुग्णसेवा करताना सुरक्षा मिळावी या हेतुने हे किट्स त्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ६२५ खासगी डॉक्टर्स आणि ३७५ शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मिळून एक हजार डॉक्टरना हे किट्स पुरवण्यात आले आहेत. कणकवलीत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते किट्स वितरण करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार राऊत, आमदार नाईक, भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते मदत कार्यासाठी झटत आहेत.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines