Tur dal : अन्न आणि पुरवठा विभागातील गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला आहे. जुलै 2021 मध्ये पूर आला होता. त्यावेळी संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेलं होतं. जनजीवन विस्कळीत झाल्यानं मोठी हानी झाली होती. यावेळी वितरणासाठी मंजूर केलेल्या तूरडाळीपैकी (Tur dal) 15 मेट्रिक टन डाळ अद्यापही शिल्लक असून, त्या तूर डाळीला भुंगा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने थेट प्रधान सचिवांना पत्र लिहले आहे.

पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला भुंगा लागला आहे. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या गलथान कारभार यानिमित्तानं पुढे आला आहे. मंजूर तूरडाळी पैकी 15.92 मेट्रिक टन तूरडाळीला भुंगा लागला आहे. दरम्यान, याबाबतचे पत्र रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलं आहे. यामध्ये पुढे कोणती कार्यवाही करावी, याबाबतचे मार्गदर्शन देखील मागवण्यात आलं आहे. तसेच राजापूर तालुक्यातील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंर्गत (पीएमजीकेएवाय)  मोफत वितरण करण्यासाठी मंजूर केलेली डाळ खराब झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. जवळपास 11 मेट्रिक टन डाळ खराब झाल्याचे समोर आले आहे.

चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळं 2021 मध्ये पूर आला होता. विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. शहरात पाणी शिरले होते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भयानक पूर असल्याचं बोललं जात होतं. चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं नागरिकांना 2005 च्या पुराची आठवण झाली होती. या पुरामुळं अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिक पाण्यात अडकले होते. या पुरामुळं चिपळूनमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. यापुरात नागरिक, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चौदा जणांचा बळी गेला होता. चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून, यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here