सातारा : महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यांत अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दरे या सातारा जिल्ह्यातील मूळ गावासह आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठा जल्लोष केला. आमच्या गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने आमच्या भागाचा नक्कीच विकास होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. मात्र त्यासोबतच गावातील लोकांनी एकनाथ शिंदे यांना एक आवाहनही केलं आहे.

‘ग्रामीण भागातील एक व्यक्ती शहरात जाऊन शाखाप्रमुख पदापासून थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचतो, याचा आम्हा खूप अभिमान आहे. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने आमच्या गावाचा विकास होणार, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र त्यांनी ठाकरे घरण्याशी संपर्क साधला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो आहे. ठाकरे घराण्याला सांभाळून घ्या,’ अशी साद गोगवे या दरे गावाच्या शेजारीच असणाऱ्या गावातील नागरिकांनी घातली आहे.

एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच ‘ओपन चॅलेंज’

एकनाथ शिंदेंचं मूळ गाव नेमकं कसं आहे?

दरे हे गाव सह्याद्री डोंगरातील जंगल आणि कोयना नदीच्या कुशीत वसलं आहे. ३० उंबऱ्यांच्या या गावात २७ कुटुंबे शिंदे आडनावाची आहेत. एकनाथ शिंदे यांचेही घर यापैकीच एक; पण संभाजी शिंदे हे रोजीरोटीसाठी ठाण्यात पोहोचले. त्यांचा मुलगा एकनाथ शिंदे त्या वेळी शाळेत होते. मात्र, शिंदे कुटुंबाने दरे गावाची नाळ तोडली नाही. गाव सोडून रोजीरोटीसाठी शहराकडे निघालेल्या वडिलांचे बोट पकडून शालेय जीवनातच ठाण्यात राहण्यास आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रभर नाव कमावलेल्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने या गावाची राज्यभरात चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here