इटावा: उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणानं संशयातून आधी त्याच्या मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच्या पत्नीसोबत राहू लागला. दोघे पती-पत्नी सारखे राहू लागले. मात्र त्यानंतर तरुणाला महिलेच्या चारित्र्यावर संशय आला. त्यामुळे तरुणानं तिची गोळी झाडून हत्या केली. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे.

इटावातील ऊसराहारमध्ये २२ जूनला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला राजस्थानची असल्याचं पोलीस तपासातून उघडकीस आलं. महिला दोन मुलांची आई आहे. तिच्या प्रियकरानंच गोळी झाडून तिला संपवलं. ऊसराहारमध्ये वास्तव्यास असलेला तिचा प्रियकर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करायचा. महिला त्याच्यासोबत दोन मुलांना घेऊन त्याची पत्नी बनून राहत होती. महिलेच्या कुटुंबीयांनी दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र नावाचा तरुण त्याची पत्नी मिथिलेशसोबत नोएडामध्ये वास्तव्यास होता. गजेंद्रसोबत सतीश नावाचा चालक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायचा. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर सतीशचे गजेंद्रची पत्नी मिथिलेशसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान सतीश, गजेंद्र आणि मिथिलेश इटाव्याला फिरायला गेले. तिथे सतीश यादवनं मिथिलेशच्या साथीनं तिचा पती गजेंद्रला खूप दारू पाजली. यानंतर गजेंद्रला कारमध्ये बसवून सीट बेल्ट बांधून ती एका कालव्यात सोडून दिली.

गजेंद्रचा मृतदेह सैफई येथे कालव्यात सापडला. पाण्यात बुडाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली. यानंतर मिथिलेश दोन महिने राजस्थानमधील तिच्या सासरी गेली. तिथून ती अचानक दोन मुलांसह गायब झाली. दोन वर्षे सतीश आणि मिथिलेश पती-पत्नीसारखे राहत होते. त्यानंतर सतीशला मिथिलेशच्या चारित्र्यावर शंका येऊ लागली. तो मिथिलेशला पूजेच्या बहाण्यानं जंगल परिसरात असलेल्या मंदिरात घेऊन गेला. तिथे त्यांनी पाठीवर गोळी झाडून तिची हत्या केली. तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. पुजेसाठी मिथिलेश नव्या नवरीसारखी नटली होती. तिच्या मृतदेहाजवळ नारळ, तांदूळ आणि पुजेचं साहित्य आढळून आलं. पोलिसांनी आरोपी सतीशला अटक केली आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here