रत्नागिरी : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली आणि बघता-बघता तब्बल ३९ आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंडखोर गटात सामील होणं पसंत केलं. या गटाचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे पक्षात हे ऐतिहासिक बंड होत असताना १६ आमदार मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांचाही समावेश आहे. याच आमदार साळवी यांच्यावर विश्वास दाखवत महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली आहे. साळवी यांची लढत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांच्याविरोधात असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहेत. साळवी यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव करून ते निवडून आले होते. राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसेना जिल्हाप्रमुखपदावरही काम केलं आहे.

‘ठाकरे घराण्यामुळे आपण इथपर्यंत आलो, त्यांना सांभाळून घ्या’; एकनाथ शिंदेंना गावकऱ्यांची साद

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असले तरी राजन साळवी यांनी मंत्रिमंडळात काम करण्यासाठी एकदाही संधी मिळालेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. मात्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांच्यामुळे साळवी यांचे मंत्रिपद हुकले होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांच्यावर शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. तसंच आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळाल्याने या निवडणुकीत नेमकं काय होतं, याकडे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here