मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर राज ठाकरे यांनी शब्द सुमनांची उधळण केली. आज त्यांचेच पुत्र अमित राज ठाकरे यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘आरे’च्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे ‘आरे’बाबतीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे बंधूंमध्ये एकमत असल्याचं पाहायला मिळतंय.

अमित ठाकरे यांची शिंदे-फडणवीस सरकारला आग्रहाची विनंती

“मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको”.

“आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंती अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे”

ठाकरेंकडून नेतेपदावरुन हकालपट्टी होताच शिंदेंनी बाह्या सरसावल्या, कोर्टात भिडणार
मावळते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे जंगलात मेट्रो कारशेड होऊ नये, यासाठी जीवाचं रान केलं. तत्कालिन फडणवीस सरकारने आरेविषयी निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ठामपणे विरोधाची भूमिका घेतली. पर्यावरणप्रेमी जनतेला सोबत घेऊन पर्यावरण वाचविण्याची हाक त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी देखील काल शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये, असा पुनरुच्चार केला. तुमचा राग आमच्यावर आहे ना, आमच्या पाठीत खंजीर खुसपला, पण आता आमच्या रागापोटी मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नव्या सरकारला केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here