अहमदनगर: राज्यातील सरकार बदलताच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ऍक्शनमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णा यांच्यामध्ये व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. यावेळी अण्णांनी शिंदे यांचं अभिनंदन केलं. तुम्ही केलेल्या कामाची पावती जनतेनं मुख्यमंत्रिपदाच्या रुपात तुम्हाला दिली आहे. खूप दिवसांनी अशी समविचारी जोडी पाहायला मिळाली, असं अण्णा हजारे शिंदे आणि फडणवीस यांच्याबद्दल म्हणाले. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम आमच्या पाठिशी असू द्या, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. वेळोवेळी मार्गदर्शन, सूचना करा, असंही शिंदेंनी अण्णांना सांगितलं.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपला लोकायुक्त नियुक्तीचा मुद्दा पुढे करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडून आता जुन्या आश्वासानाची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यासंबंधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन कार्यवाही सुरू केली होती. मात्र, नंतर त्यांचे सरकार गेले. राज्यात अद्याप लोकायुक्त येऊ शकला नाही. आता सत्तांतर होऊन फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आता ते हे आश्वासन पूर्ण करतील, असा विश्वास हजारेंनी व्यक्त केला.
राज ठाकरेंकडून कौतुक, मुलाकडून फडणवीसांवर नाराजी, अमित ठाकरेंचं ‘आरे’ला कारे
राळेगणसिद्धी येथे ‘लोकपाल कायदा २०१३’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हजारे म्हणाले, ‘आपल्या प्रदीर्घ आंदोलनानंतर लोकपाल कायदा झाला. लोकपालाचे कार्यालयही सुरु झाले. पण हे कार्यालय दिल्लीत आहे. सामान्य कार्यकर्त्यांना तक्रार करण्यासाठी, न्याय मागण्यासाठी दिल्लीपर्यंत जाणे कठीण आहे. त्यामुळे लोकपालची कार्यालये राज्यातही व्हावीत यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला पाहिजे. काही लोकांना हा कायदा नको होता. परंतु जनशक्तीचा दबावामुळे संसदेला हा कायदा करावा लागला,’ असेही हजारे म्हणाले.
ठाकरेंकडून नेतेपदावरुन हकालपट्टी होताच शिंदेंनी बाह्या सरसावल्या, कोर्टात भिडणार
राज्यातील लोकायुक्त कायद्यासंबंधी हजारे म्हणाले, ‘लोकपाल हा केंद्रासाठी तर लोकायुक्त हा राज्यासाठी आहे. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आपण लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन केले होते त्यावेळी फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन कायदा करण्यासंदर्भात आश्वासन दिल्याने आपण उपोषण सोडले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनीही यासंबंधी लेखी आश्वासन दिले. देशभरात तामिळनाडू, उत्तराखंड अशा दोन तीन राज्यात लोकायुक्तची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मात्र, अद्याप लोकायुक्तची अमंलबजावणी झालेली नाही. आता राज्यात पुन्हा सत्तांतर झालेले आहे. फडणवीस यांनी त्यावेळी हा कायदा करण्याबाबत आश्वासन दिले होते. ते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात लोकायुक्तची अमंलबजावणी होईल,’ असा विश्वास वाटतो, असेही हजारे म्हणाले.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अजित देशमुख, वाशीम येथील जिल्हा संघटक अविनाश पसारकर, सातारा जिल्हा संघटक तात्यासाहेब सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता आवारी, पुणे जिल्हा संघटक शिवाजीराव खेडकर, जालना जिल्हा संघटक शिवशंकर गायकवाड, हिंगोलीचे जिल्हा संघटक डॉ. धायगुडे, परभणी जिल्हा संघटक डॉ. लक्ष्मण जाधव, प्रकाश पाचारणे, बाबूराव पाचंगे, नितीन थोरात यांच्यासह राज्याभरातून आलेले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here