देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा दावा करतावेळी राज्यपालांची भेट घेतली असता राज्यपालांनी त्यांना पेढा भरवला. त्याचे फोटो समाजमाध्यांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याच फोटोंवर आज शरद पवार यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
“मी पण वेगवेगळ्या पदांकरिता शपथा घेतल्या पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात कधी पेढा भरवला नाही. कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही. तसेच मागील शपथविधी वेळी अनेकांनी सुरुवातीला स्मरण करून शपथ घेतली. तर राज्यपाल जरा चिडलेले पाहायला मिळाले. त्यांनी संबंधितांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. पण यावेळी काय झालं आपण सर्वांनी पाहिलं”, असा टोलाही यावेळी पवारांनी लगावला.
पवार म्हणाले की, “सभागृहात गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. पण असं बोललं जातंय की सभागृहात बसल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालेलं बघायला मिळेल. असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही. माझा त्या बंडखोर आमदारांशी काहीच कॉन्टॅक्ट नाही. माझा संबंध हा सेनेच्या नेत्यांशी आहे. आमदारांशी नाही. त्यामुळे ते आमदार उद्या नक्की काय करणार हे माहिती नाही”.
अध्यक्षपदाची निवडणूक कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? यावर पवार म्हणाले, “आत्ता तर झिरवळ उपाध्यक्ष आहेत. पण सभागृहाने काही निर्णय घेतला तर तो निर्णय अंतिम आहे. कोर्टात त्यांच्या विरोधात जर याचिका असेल तर याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांचं पद गेलेला नाही. आज रोजी कायद्याने त्यांना अधिकार दिला आहे”