मुंबई : महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडखोरी करून सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातील शिंदे सरकारची विधिमंडळात आज, रविवारपासून दोन दिवस परीक्षा आहे. त्यातील पहिलाच पेपर ‘व्हिप’चा असल्याने त्यातील प्रश्न कसे सोडवणार, याकडे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वास सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात आज, रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला आहे. हा व्हिप शिवसेनेच्या बंडखोरांनाही लागू होणार असून, निवडणूक आवाजी पद्धतीने होणार असल्यामुळे पेच निर्माण होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी पार पडणाऱ्या निवडणुकीनिमित्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे याच्या गटात पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत आहे, तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपसोबत आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहेत. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप प्रभू यांनी लागू केला आहे. दुसरीकडे शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधिमंडळाचे गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आले आहे; पण हे बदल शिंदे गट मान्य करण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आधीच न्यायालयात गेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रभू यांचा व्हिप ऐकला नाही, तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार नार्वेकर यांना मतदान करणे शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे.

बंडखोर आमदारांबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, ‘ते सभागृहात आल्यानंतर…’

ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करते, हे उघडपणे दिसणार आहे. अशा वेळी व्हिप मोडल्यानंतर शिवसेनेकडून जी कारवाई होईल, ती संबंधित एकनाथ गटाचे आमदार कशी थोपवणार, त्यासाठी कोणती कारणे देणार, ही कारणे कशी ग्राह्य धरली जाणार आणि या सर्व मुद्द्यांवर न्यायालयाचे काय म्हणणे असणार, याबाबत उत्सुकता आहे.

‘आम्हाला व्हिप लागू होत नाही’

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याच्या हॉटेलमधून शनिवारी रात्री उशिरा मुंबईमध्ये दाखल झाले. शिंदे स्वत: या आमदारांना मुंबईत घेऊन आले. या आमदारांसोबत गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्व आमदारांना घेऊन मुंबईला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘शिवसेनेचा व्हिप आम्हाला लागू होऊ शकणार नाही. शिवसेनेचे दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हिप आमच्यासाठी नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहोत,’ असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here