एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना लिहिलेला मजकूर त्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
काय होते शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ट्वीट?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं ट्वीट केलं आहे.