मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शीरगणतीद्वारे विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू झाली. मात्र ही मतमोजणी सुरू असतानाच १४ क्रमांकाच्या मतापर्यंत मोजणी जाताच गोंधळ उडाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही सूचना केल्या.

Shivsena Assembly Office Sealed: विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे

मतमोजणी सुरू असतानाच जयंत पाटलांची सूचना आणि फडणवीसांचंही अनुमोदन

शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार १, २, ३ याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिलं आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या राहुल नार्वेकर यांची राजकीय कारकीर्द

राहुल नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.

LIVE : राहुल नार्वेकरांनी बहुमत जिंकलं, १६० पेक्षा अधिक मतं

राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२७ मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक २२६ मधून नगरसेविका आहेत.

राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहेत. साळवी यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव करून ते निवडून आले होते. राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसेना जिल्हाप्रमुखपदावरही काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here