मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळातील पहिल्याच भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘महाराष्ट्रात आज भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालं आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. राज्यानेच नाही, तर देशाने या घटनेची नोंद घेतली. सत्तेतून पायउतार होऊन लोक बाहेर पडले. मी नगरविकास मंत्री होतो, माझ्यासह आठ ते नऊ मंत्री बाहेर पडले. एकीकडे राज्यातील आणि देशातील मोठमोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा हा सैनिक एकनाथ शिंदे होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हे मी माझं भाग्य समजतो,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतील ३९ आणि काही अपक्ष आमदारांना सोबत घेऊन पक्षनेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. या सर्व आरोपांना शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ‘माझ्यासोबतचे आमदार फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, काही लोक म्हणाले आमच्या संपर्कात २० आहेत, काही म्हणाले २५ आहेत. मात्र आमदार संपर्कात असल्याचा दावा करणारे एकही नाव सांगू शकले नाहीत. एका आमदाराला तर मी स्वतः चार्टर फ्लाईटने पाठवून दिलं. त्यामुळे कुणावरही जोरजबरदस्ती झालेली नाही. ११५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करत मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचेही मी आभार मानतो,’ असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

Rahul Narvekar Won: शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली; विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचा विजय

दरम्यान, आज फक्त पार्श्वभूमी सांगितली, उद्या सगळं सांगणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here