मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणे केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटे काढत सभागृहात चांगलाच हशा पिकवला. ‘शिंदे साहेब तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तरी आम्ही आधीच तुम्हाला तिथं बसवलं असतं,’ असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना यांना चिमटा काढला.

‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. भाजपचे सगळे नेते तर रडायला लागले. भाजप नेते गिरीश महाजन तर अजूनही रडायचे थांबले नाहीत. भाजपच्या १०६ आमदारांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा हे काय झालं. चंद्रकांत दादा, तुम्ही तर बाकं वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाचं काही खरं नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी राज्यातील सत्तानाट्यावरून भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसताच राहुल नार्वेकरांचा रेकॉर्ड, देशभरात नाव

राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी आपल्या हटके शैलीत नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. नार्वेकर यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, ‘तुम्ही आदित्यचे खास होता असं ऐकलं. हुशार होतात. अशा लोकांवर आम्हीही नजर ठेवून असतो. मला २०१४ मध्ये मावळ लोकसभेसाठी उमेदवार हवा होता. तेव्हा आम्ही तुम्हाला उमेदवारी दिली. पण मोदी साहेबांची जबरदस्त लाट होती, त्यात तुमचा पराभव झाला. तुम्ही सांगितलं, मला लोकसभेला अपयश आलं तर मला कुठे तरी सदस्य करा. त्यांना आम्ही विधानपरिषदेचे सदस्यत्व दिलं. त्यांनी राष्ट्रवादीतही उत्तम काम केलं. ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही चांगलं काम करतील यात शंका नाही. मला एका गोष्टीचं विशेष कौतुक आहे. नार्वेकर कुठेही गेले तरी ते पक्ष नेतृत्वाच्या अत्यंत जवळ जातात. इकडे आदित्य, राष्ट्रवादीत मी आणि भाजपात ते फडणवीसांचे खास झाले. आता शिंदे साहेब तुमचंही काही खरं नाही. मुनगंटीवार साहेब, महाजन तुम्हा कुणालाच जमलं नाही ते नार्वेकरांनी तीन वर्षात करुन दाखवलं,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here