मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्यात मागील दोन आठवड्यांमध्ये घडलेलं राजकीय नाट्य आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले. यावेळी बोलताना युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपवर निशाणा साधला आहे.

‘आम्ही कानात जे सांगितलं होतं ते भाजपने ऐकलं असतं तर आज जी परिस्थिती दिसत आहे ती अडीच वर्षांपूर्वीच झाली असती,’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींची आठवण करून दिली. भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन न पाळल्यानेच आम्ही युती तोडली, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतो. त्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे.

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केलं. तसंच उपमुख्यमंत्री हुशार आहेत, राष्ट्रवादीची जवळीक असलेल्या आमदाराला वर बसवलंय, असं म्हणत आदित्य यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

दीपक केसरकर काय चांगला प्रवक्ता झालाय, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही: अजित पवार

आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर

सध्या कुलाबा मतदारसंघातून भाजपचे आमदार असलेले राहुल नार्वेकर हे कधीकाळी शिवसेनेत होते. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून राहुल नार्वेकर यांची ओळख होती. त्यांनी अचानक पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर राष्ट्रवादीतही नार्वेकर यांचं मन फार काही काळ रमलं नाही आणि त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी आज अभिनंदन करत असताना राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here