मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार पहिल्या लढाईत पास झालं आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मतं मिळाली. तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतंच मिळवता आली. यानंतर उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आजचा दिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणांनी गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची भाषणं चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शायरीतून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
‘तो’ राज्यालाच शॉक होता; गिरीश तर अजून रडतोय, पण काय करणार?; अजितदादांची फटकेबाजी
विधानसभेची निवडणूक शिरगणती पद्धतीनं झाली. सर्वप्रथम भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची शिरगणती झाली. त्या सगळ्यांनी नार्वेकरांच्या बाजूनं मतदान केलं. यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजन साळवी यांच्यासाठी मतदान केलं. मतदानासाठी उभे राहत असताना काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘ऐसे वैसे कैसे कैसे हो गये और कैसे कैसे ऐसे वैसे हो गये’, अशा शब्दांत गोरंट्याल यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबत १० अपक्षदेखील होते. त्यांचा मुक्काम आधी सूरत, मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यात होता. आमदार गुवाहाटीत वास्तव्याला असताना शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, अशा शब्दांत पाटलांनी तिथल्या मुक्कामाचं वर्णन केलं. त्यावरून गोरंट्याल यांनी जोरदार टोला हाणला. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल.. ओक्के? ५० खोके पक्के, अशा शब्दांत गोरंट्याल यांनी बंडखोरांना चिमटा काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here