याप्रकरणी अधिक माहिती मिळाल्यानुसार, शेख हे काही महिन्यांपूर्वी तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची बहीण औरंगाबादेत राहते बहिणीला भेटण्यासाठी शेख हे शनिवारी रात्री औरंगाबादला आले. ते रात्री तेथेच थांबले होते. सकाळी ते घरी गंगापूर येथे जाण्यासाठी निघाले. मात्र, ते तिकडे न जाता सकाळी ते सिद्धार्थ उद्यानात गेले. उद्यानातील मत्स्यलय जवळील झुडुपात त्यांचा मृतदेह आढळून आला. शरीरावर धारदार शास्त्राने अनेक वार होते. तर रक्तबंबाळ व झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शेख यांचा मृतदेह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दिसला. ही माहिती कर्मचऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत. मृतदेह फासावरून खाली उतरवत उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला.
याप्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, ही हत्या की आत्महत्या याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ज्या ठिकाणी शेख यांचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी पोलिसांना एक पिशवी आढळून आली. त्या पिशवीमध्ये शेख यांचे कार्यालयीन कागदपत्रे होती. तर घटनस्थळी एक धारदार चाकू पोलिसांना आढळून आला आहे. कार्यालयात केलेले अर्ज देखील आढळून आले. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो, अशी माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांनी दिली आहे.