उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं. भररस्त्यात कोल्हे यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. युसूफ खाननं कोल्हेंची पोस्ट व्हायरल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे युसूफ खान कोल्हेंचा चांगला मित्र होता. गेल्या १५ वर्षांपासून त्यांची ओळख होती.
उमेश कोल्हेंनी व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये नुपूर शर्माशी संबंधित पोस्ट केले. त्यात डॉ. युसूफ खान बहादूर खानदेखील होता. उमेश यांनी नुपूर शर्माशी संबंधित पोस्ट स्वत: लिहिलेल्या नव्हत्या. तर सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या. युसूफनं या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले आणि मुस्लिम सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये पाठवले.
युसूफनं काढलेले स्क्रीनशॉट अनेक ग्रुपमध्ये पाठवले. ते व्हायरल झाले. त्यानंतर कोल्हेंच्या हत्येचा कट रचण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पेशानं पशु चिकित्सक आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. युसूफनं उमेश कोल्हेंच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले नसते, तर कदाचित कोल्हेंची हत्या झाली नसती.
उमेश कोल्हेंचे भाऊ महेश यांनी सांगितल्यानुसार, युसूफ खान आणि उमेश यांचे उत्तम संबंध होते. दोघे एकमेकांना २००६ पासून ओळखायचे. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र युसूफ यांनी उमेश यांचा विश्वासघात केला. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी महेश यांनी केली.