मुंबई : ‘आरे’ला कारे करणाऱ्या ठाकरे बंधूंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनीस यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. आरेमधील बहुतांश काम आधीच पूर्ण झालंय. आरेमधील काम पूर्ण होऊन वर्षभरात मेट्रो सुरु होईल. काही प्रमाणात असणारा विरोध समजू शकतो. पण बहुतांश विरोध स्पॉन्सर्ड आहे. कांजुरमार्गला कारशेड नेलं तर नाकापेक्षा मोती जड होईल, बजेटही वाढेल, असं रोखठोक प्रत्युत्तर देताना सुप्रीम कोर्टासमोर सगळे पुरावे आणि तथ्य मांडून झाल्यानंतरच कोर्टाने परवानगी दिली, अशी आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना आणि आंदोलनकर्त्यांना करुन दिली.

नवनिर्वाचित शिंदे सरकारने आपला पहिला निर्णय जाहीर करताना मेट्रोसाठीची कारशेड आरेमध्येच होणार असल्याचे सांगितले. मात्र कारशेडसाठी आरेचा आग्रह रेटून मुंबईकरांच्या काळजात कट्यार खुपसू नका, अशी कळकळीची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आज आरेमध्येही पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

Video : यामिनी जाधव उभ्या राहिल्या अन् आमदारांच्या ईडी-ईडीच्या घोषणा, सभागृहात नक्की काय घडलं?

वर्षभरात मेट्रो सुरु होऊ शकते

आरेचा विरोध हा काही प्रमाणात खरा आहे. काही प्रमाणात स्पॉन्सर केलेला आहे. आंदोलन करण्याचा, मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तो प्रकल्प सुरु झाला. झाडं कापलेली आहेत. नंतर २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. आता झाडं कापण्याची गरज नाही. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात लिहिलंय की संपूर्ण झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफटाईमध्ये जेवढं कार्बन शोषतील तेवढा कार्बन शोषण्याचं काम ही मेट्रो ८० दिवसांच्या फेऱ्यांमध्ये करेन, म्हणूनच त्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी दिली.

आंदोलन पुरस्कृत असण्याची शक्यता

आता झाडं कापण्याची गरज नाही तरीही अशाप्रकारचं आंदोलन होतंय. काही पर्यावरणवादी ही माहिती नसल्याने आंदोलन करत असतील तर काहींचं आंदोलन हे छद्मपर्यावरणवादी बनून स्पॉन्सर्ड असण्याची शक्यताही आहे. पर्यावरणवाद्यांचा आदर राखून त्यांच्याशी चर्चा करु. मेट्रो मुंबईचा अधिकार आहे. मुंबई प्रदुषणामुळे रोज होरपळते, हे पाप आम्ही होऊ देणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

आधी सामंतांमुळे मंत्रिपद हुकलं, आता विधानसभा अध्यक्षपदही निसटलं, राजन साळवींना धक्का
..नाकापेक्षा मोती जड होईल!

जर कांजूरला मेट्रोचं कारशेड नेलं तर बांधकामाला ४ वर्ष लागतील. १०-१५ हजार कोटींचा खर्च होईल, आधीच १० हजार कोटींचा खर्च झालाय. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड होईल, त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो लवकरात लवकर मिळण्याकरिता पर्यावरणपुरक निर्णय आम्ही घेणार आहोत, असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here