९ दिवस आणि ९ रात्रीच्या सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. शिवेसेनेच्या सर्वच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. व्हीप बजावल्यानंतर बंडखोरांपैकी काही मते आपल्या बाजूने वळतील, अशी शिवसेनेला आशा होती. मात्र एकाही बंडखोर आमदाराने राजन साळवी यांना मत दिलं नाही. साहजिक राजन साळवी यांचा पराभव झाला. ज्यानंतर शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलत बंडखोरांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
त्या ३९ आमदारांवर निलंबनाची कारवाई करा
शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिपच्या विरोधात मतदान केलं. याच पार्श्वभूमीवर ३९ आमदारांच्या निलंबनाची याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधिमंडळ कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे असल्याच्या बातम्या चुकीच्या
शिंदे गटानेही व्हीप काढला आहे. त्यांनीही शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, या प्रश्नावर उत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिंदे गटाचं अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का? शिवसेना रजिस्टर पक्ष आहे, पक्षाला मान्यता आहे. दोन तृतीयांश आमदार असल्याचं सांगून भ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे असल्याच्या बातम्या चुकीच्या, उद्या कार्यालय उघडेल, असंही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.