सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या सर्वोत्तम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी अॅड. दीपक चटप यांची निवड झाली आहे. त्यांच्या लंडनमधील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारने स्वीकारली. अॅड. दीपक चटप हे ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून ही संस्था दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते. लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स या विभागाला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापीठातील सोहेल भट्ट, भाऊ डाॅ. जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी मित्रांनी त्यांना साथ दिली.
कशी आहे दीपक यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
अॅड. दीपक चटप यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे तर पुण्यातून त्यांनी एलएलबी पूर्ण केलं आहे. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदुषणाची याचिका त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकराणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयी मानवाधिकार आयोगाकडे त्यांनी अनेक तक्रारी दिल्या. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह आणि ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. कोरो इंडिया फेलोशिपद्वारे हक्कांवर ते काम करीत आहेत.
लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, कुटुंब व मित्रांनी खंबीर साथ दिल्याने ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकलो. लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी. आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणार आहे. त्यांनी संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील 1200 विद्यार्थ्यांना संविधान विषयक प्रशिक्षण दिले. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नावर मोफत वकीली, शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवून त्याने या शिष्यवृत्तीसाठी आपण पात्र असल्याचे कृतीतून दाखवून दिल्याने त्याचे अभिनंदन केले जात आहे.