कोल्हे यांच्या हत्येमध्ये त्यांचा मित्र युसूफ खानचादेखील हात आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे. युसूफनं उमेश यांच्याकडून २ लाखांची औषधं उधारीवर घेतली होती. या उधारीचा उल्लेख उमेश यांच्या केमिस्टमधील डायरीत आहे. ती डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कोणाकडे किती रुपयांची उधारी होती, याचा संपूर्ण तपशील डायरीमध्ये आहे. गेल्या २ वर्षांतील नोंदी या डायरीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रहबर नावाच्या एका संस्थेचा संचालक आहे. पोलिसांनी संस्थेच्या बँक खात्यांचा तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली. कोल्हे आणि कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये एक समान धागा आहे. या दोघांनी भाजपच्या माजी पदाधिकारी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
युसूफ खान कोण?
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं. भररस्त्यात कोल्हे यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. युसूफ खाननं कोल्हेंची पोस्ट व्हायरल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे युसूफ खान कोल्हेंचा चांगला मित्र होता. गेल्या १५ वर्षांपासून त्यांची ओळख होती.
उमेश कोल्हेंनी व्हॉट्स ऍप ग्रुपमध्ये नुपूर शर्माशी संबंधित पोस्ट केले. त्यात डॉ. युसूफ खान बहादूर खानदेखील होता. उमेश यांनी नुपूर शर्माशी संबंधित पोस्ट स्वत: लिहिलेल्या नव्हत्या. तर सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या. युसूफनं या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले आणि मुस्लिम सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये पाठवले.
युसूफनं काढलेले स्क्रीनशॉट अनेक ग्रुपमध्ये पाठवले. ते व्हायरल झाले. त्यानंतर कोल्हेंच्या हत्येचा कट रचण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पेशानं पशु चिकित्सक आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. युसूफनं उमेश कोल्हेंच्या मेसेजचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले नसते, तर कदाचित कोल्हेंची हत्या झाली नसती.