शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रतोदांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना तर शिंदे गटाच्या प्रतोदांनी नवे अध्यक्ष नार्वेकर यांना पक्षादेशाचे पत्र दिले. या दोन्ही पत्रांची दखल घेऊन अध्यक्ष आता काय निर्णय देतात, हे पाहावे लागेल. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षातील फूट मान्य झाली तर या दोन व्हिपबद्दल अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा पक्षादेश सर्व ५५ सदस्यांनी पाळणे आवश्यक होता, असा दावा ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मात्र, ही निवडणूक झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी व आमदारांनी नार्वेकर यांच्या अभिनंदनाची जी भाषणे केली, त्यांतून या प्रक्रियेवरचा असंतोष दिसत नव्हता. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये तर तो बिलकुलच उमटत नव्हता. उलट, नार्वेकर यांना आता निम्माच म्हणजे अडीच वर्षांचा काळ मिळतो आहे, असे काही आमदार म्हणाले. याचा अर्थ, महाराष्ट्र विकास आघाडीतील हे दोन पक्ष या लढाईत शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर असतीलच, याची काहीही खात्री नाही. त्यांच्या दृष्टीने हा विषय संपलेला असू शकतो. ‘तुमच्या पक्षाचे आमदार तुम्हाला सांभाळता आले नाहीत आणि आता या तांत्रिक व कायदेशीर लढायांना कितपत अर्थ आहे?’ ही आघाडीतील काही नेत्यांची भावना चूक नाही. या पार्श्वभूमीवर, आजचा विश्वास ठराव ही औपचारिकता उरली असली तर मुख्यमंत्र्यांसहित सर्व नेत्यांनी भाषणे करताना संयम पाळणे आवश्यक आहे. ‘डोळे हे जुलमी गडे, रोखुनि मज पाहू नका,’ इतका राग व्यक्त करण्याची गरज नसली तरी परस्परांकडे पाहण्यास आणि हातात हात घेण्यास काही हरकत नाही. पुढची अडीच वर्षे एकत्र काढायची असतील तर आदित्य ठाकरे म्हणतात तसा ‘डोळ्याला डोळा’ जरूर द्यावा. याबाबत काँग्रेसचा आदर्श भाजप व दोन्ही सेनांनी घ्यायला हवा. बॅ. ए. आर. अंतुले यांचे काँग्रेस सरकार १९८० मध्ये असताना शरद पवार यांचा समाजवादी पक्ष सरकारला सहकार्य करीत नाही, अशी तक्रार सत्ताधारी करीत होते. तेव्हा, ‘आमचे ५२ आमदार तुम्हाला दिले. आणखी किती सहकार्य करू?’ असा मार्मिक, दिलखुलास शेरा तेव्हाच्या पक्षांतराला अनुलक्षून पवारांनी मारला होता. हे दिलदारीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून राज्याचे राजकारण सर्वांनी पुढे न्यावे.
महाराष्ट्र टाइम्सचा आजचा अग्रलेखः डोळे हे जुलमी गडे…
विधानसभेला नवे अध्यक्ष मिळाले. राहुल नार्वेकर हे सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष १६४ मते मिळवून विजयी झाले. नार्वेकर यांनी आजवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास केल्यामुळे सभागृहात त्यांचे बरेच मित्र आहेत आणि सभागृह चालविणे त्यांना सोपे जाऊ शकते. ही निवडणूक खेळीमेळीत पार पडली. भाजप, शिंदे-सेना आणि अपक्ष यांच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे, आज-सोमवारी मांडला जाणारा विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता ठरली आहे. कोणताही नवा कलह न होता हा ठरावही शांततेत पार पडावा. अध्यक्षांच्या निवडीनंतर बोलताना अनेक सदस्यांनी सीमा ओलांडून टोलेबाजी केली. त्यात अजित पवार प्रमुख होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी भाषण अभिनंदनापुरते मर्यादित ठेवले नाही. आज सभागृहात भाषणांचा जो धमाका होणार आहे, त्याची ही चुणूक होती. छगन भुजबळांनी मध्येच सोशल मिडियावरचा विनोद वाचून दाखविणे, हा तर औचित्यभंगच होता. आदित्य ठाकरे यांनी ‘आपले जुने मित्र’ राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना ‘डोळ्यांत डोळे घालून’ सत्ताधारी पाहात नसल्याचे म्हटले आणि नंतर शिवसेनेतील फुटिरांची नैतिक परीक्षा झाली; असाही शेरा मारला. याचा अर्थ, शिवसेनेने विधानसभेत शिंदे सरकार बहुमतात आहे, ही ‘दगडावरची रेघ’ मान्य केली आहे. नैतिकतेची भाषा संदिग्ध व सापेक्ष असते. तिने वस्तुस्थितीत फरक पडत नाही. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रतोदांनी व्हिप म्हणजे पक्षादेश काढले होते. मतदानाचे आकडे पाहता हे दोन्ही पक्षादेश अनेक सदस्यांनी धुडकावले. आता ही लढाई तीन पातळीवर लढली जाईल. पहिली लढाई, विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत. नार्वेकर हे कायदेतज्ज्ञ असल्याचे कौतुक रविवारी झाले. तेव्हा त्यांना हा पक्षादेशाचा आणि त्या अनुषंगाने येणारा शिवसेनेतील फुटीचा मुद्दा हाताळावा लागेल. सभागृहातील बलाबल पाहता, अध्यक्षांच्या कौलाचा अंदाज येऊ शकतो. ही दुसरी लढाई न्यायालयात जाईल. तिची सुरूवातही झाली आहे. तिसरी लढाई, निवडणूक आयोगाच्या व्यासपीठावर होईल. तेथे शिवसेना या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या घटनेला अनुसरून इतर काही मुद्दे येतील. ही सारी लढाई दीर्घ काळ चालू शकते. त्याचवेळी, राज्यातला व विशेषत: महामुंबईतील मैदानातला शिवसैनिक काय ठरवतो, यावरही दोन्ही गटांचे पुढचे राजकारण अवलंबून आहे. या साऱ्या प्रक्रियेतला पहिला टप्पा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने ओलांडला गेला. तो टप्पा एकनाथ शिंदे यांच्या गटाने जिंकला आहे.